मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडी पथकाने ताब्यात घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोठा तणाव निर्माण झाला आहे.
संजय राऊत यांच्या घरी सकाळी 7.30 वाजेपासून ईडीचे पथक पोहोचले होते. दरम्यान, संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे ईडी अधिकारी आणि राऊत यांना बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्र शिवसैनिकांनी घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट ईडीच्या पथकाने सील केला आहे. हा फ्लॅट राऊत यांनी 83 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
राऊत यांची तब्बल साडे सात तासांपासून चौकशी करण्यात आली. राऊत यांच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. या टीममध्ये सुमारे 10 ते 12 अधिकारी असून त्यापैकी सात अधिकारी राऊत यांच्या घरी आहेत, तर उर्वरित त्यांच्या दोन जवळच्या मित्रांच्या घरी कारवाई करत आहेत. राऊत यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. त्याचबरोबर ईडी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राऊत यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयाकडे घेऊन जाणार आहे. राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. त्यांना आता मागे हटवायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांची गेल्या 10 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.
















