नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला या आठ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १६,७६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २२० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या १,२७० वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे देशात आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (31 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांहून अधिक झाला आहे.
देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १,२७० वर
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारा आकडा आता समोर आला आहे. देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या १,२७० वर पोहोचली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्क्यांवर आहे. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान आरोग्य मंत्रालयाने आठ राज्यांना कोरोनाविरोधात कठोर पावले उचलण्यास सांगितलं आहे.