जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीसाठी ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या आरक्षणामुळे यंदाही महापालिकेच्या महापौरपदी महिलाच विराजमान होणार असून महापालिकेत ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे.
ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपकडून दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे आणि वैशाली पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दीपमाला काळे आणि उज्वला बेंडाळे या दोघीही चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्याने पक्षातील निष्ठावंत मानल्या जात असून, त्यांच्यापैकी एकीला महापौरपदाची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे दरम्यान, वैशाली पाटील या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्या मंत्री गिरीश महाजन, आणि आमदार मंगेश चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमित पाटील यांच्या पत्नी असल्याने, त्यांनाही महापौरपदासाठी संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आता उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, वैशाली पाटील किंवा अन्य कोणाला भाजपकडून संधी दिली जाणार, तसेच पक्षश्रेष्ठ नेमका कोणावर विश्वास दाखवणार, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागून आहे.
















