वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संघर्ष आता कोर्टात पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. पेन्सिलवेनिया, जॉर्जिया आणि मिशिगन या राज्यांतील मतमोजणीवर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने ही राज्ये अतिशय महत्त्वाची आहेत. जो बायडन यांनी मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना २६४ इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ ६ मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला २७० इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यांनी कालच या संदर्भात आरोप केले होते. आज त्यांनी कोर्टात केस दाखल केली आहे.दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पिछाडीबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या सगळ्याच राज्यांमध्ये आम्ही आघाडीवर होतो. त्यानंतर मात्र, अचानकपणे आमची पिछेहाट होण्यास सुरुवात झाली. हे एका रात्रीत कसं काय शक्य होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही ही निवडणूक जिंकलो असून मतमोजणीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहोत. अमेरिकन जनतेसोबत धोका होत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला होता. तसंच ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले की, पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.