धरणगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नावाने जळगाव जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज या पोलिसाला जामीन मंजूर झाल्यानंतर धरणगाव पोलिसांनी विद्यापीठातील अशाच एका गुन्ह्यात ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचारी नरेंद्र वारुळे याचा आज १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयिताकडून अॅड. विजय पाटील आणि अॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पहिले. ज्या पोलिसांना अश्लील मॅसेज गेले, त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही क्रमांक होता. त्यामुळे याच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. धरणगाव, अमळनेर व नाशिक येथे दाखल गुन्ह्यांमध्ये देखील वारुळे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान, नरेंद्र वारुळे याला जामीन मंजूर झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे कळते.
दरम्यान, पोलीस दलातील अंतर्गत वादातून वारुळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील कुणाल पवार यांनी न्यायालयाला केला होता. तसेच आज अॅड. विजय पाटील यांनी युक्तिवाद केला की, गुन्हे उकल करण्याच्या स्पर्धेतून पोलीस दलातीलच काही लोकांनी वारुळे यांना या गुन्ह्यात गोवले आहे. तसेच वारुळे यांनी पोलीस दलात मोठी सेवा बजावली आहे. त्यामुळे ते तपासात अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करणार नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. दरम्यान, यानंतर कोर्टाने वारुळे यांना पोलिसाचा १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात सरकारतर्फे अँड.रंजना पाटील तर संशयित आरोपीतर्फे अँड. कुणाल पवार आणि अँड विजय पाटील तसेच अँड.राजेश काब्रा यानी कामकाज पाहिले. दरम्यान, विद्यापीठ कॉलनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल वारुळे याला आज धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे कळते. एवढेच नव्हे तर, धरणगाव पोलीस स्थानकात याबाबत त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे देखील वृत्त आहे.
















