धरणगाव (प्रतिनिधी) येथील मार्केट कमेटीत सुरु असलेल्या शाशकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांची काळी ज्वारी खरेदी न करता, व्यापाऱ्यांची ज्वारी खरेदी केली जात आहे. हे केंद्र शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत असून, त्यांनी केंद्रावर ठिय्या दिला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शेतकरी नावे सेनू उदाराम पाटील, महेंद्र गोकुळ पाटील, राकेश पाटील, जिगर पाटील अंजनविहिरे, रवी पाचपोल, सोपान पाटील, पंकज पाटील, धार नंदलाल पाटील सारवे इत्यादी शेतकरी संदेश आल्याप्रमाणे ज्वारी खरेदी केंद्रावर घेवुन गेले. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी आपणास काळी ज्वारी खरेदी करता येत नाही असे सांगून खरेदीला नकार दिला. शेतकऱ्यांशी बेजबाबदारपणे वागत त्यांना तहसीलदार यांचा आदेश आणा असे सांगितले.
खरेदीसाठी ताटकळत असलेले शेतकरी तहसिलदारांकडे गेले. तेथे त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. तहसीलदारांनीही त्यांना, हे माझे काम नाही. फक्त केंद सुरू करणे व गोडाऊन उपलब्ध करणे येव्हढंच आपलं काम असल्याचे सांगून टाळून लावले असे सेनू पाटील यांनी सांगितले. या नंतर कोणाच्या तरी आदेशाने खरेदी सुरू झाली. त्यात बहुतेक व्यापाऱ्यांची पांढरी ज्वारी खरेदी केली. अती वृष्टी झाली आहे तर ही पांढरी ज्वारी आली कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला.
या पूर्वीही काळी ज्वारी खरेदी केलेली असतांना आताच बंद का करण्यात आली ? गोडावूनमध्ये खरेदी केलेले काळ्या ज्वारीचे पोते पडलेले आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला. कुणी तक्रार केली म्हणून अधिकारी खरेदी बंद करतात. फक्त शेतकरीच्या मालाचा सॅम्पल घेतात आणि व्यापारीची जुनी पीठ झालेली, जाळे लागलेली ज्वारीचे सॅम्पल घेत नाही ही शेतकऱ्यांची कुचंबणा असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुपारी एक वाजे पासून काटा बंद आहे. शेतकरी विनंत्या करतो आहे. त्यांनी माल विक्रीसाठी आणला, त्या वाहनांचे भाडे वाढत आहे. मात्र खरेदी केंद्रवाले मग्रुरी दाखवून खरेदी बंद करुन बसले आहेत. ज्वारीची खरेदी झाली नाही तर आपण येथेच बसू असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.