रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ऐनपूर येथील बारागाड्यांवरील वेगाचे नियंत्रण सुटल्याने त्या थेट प्रेक्षकांवर धडकल्या. या अपघातात एकजण ठार, तर भगताचे साथीदार बगले आणि महिलेसह नऊजण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. दिनकर रामकृष्ण जैतकर (कोळी) (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ऐनपूर येथे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. या प्रथेप्रमाणे बारीघाट येथे रविवारी (दि.२३) सायंकाळी बारागाड्यांची तयारी पूर्ण करण्यात आली. रविवारी सायंकाळी बारीघाट परिसरात बारागाड्या ओढल्या जात होत्या. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो ग्रामस्थ भाविकांची उपस्थिती होती. भगत म्हणून सोपान भील, तर बगले म्हणून सुनील महाजन आणि सचिन महाजन सहायक होते. त्याचवेळी बारागाड्यांवरील नियंत्रण सुटले आणि त्या थेट बाजूला असलेल्या प्रेक्षकांवर धडकल्या. त्यात रस्त्यावर प्रेक्षकांमध्ये उभे असलेले दिनकर रामकृष्ण कोळी (वय ६०) यांच्या डोक्याला बैलगाडीच्या जू (दुस्सर) चा धक्का लागला. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
ही दुर्घटना झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बारागाड्या नियंत्रित करताना धावपळ उडाली. त्यात मंगलाबाई प्रकाश भील, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी, मोहन एकनाथ महाजन, बगल्यांमध्ये सुनील राजाराम महाजन, जू ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भील हे जखमी झाले. बारागाड्यांपैकी पहिले गाडे गटारात अडकून इतर गाडे त्यावर धडकले. दरम्यान, जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दिनकर रामकृष्ण कोळी यांना मृत घोषित करण्यात आले.