जळगाव (प्रतिनिधी) ‘बीएचआर’ प्रकरणी गुन्ह्यात झंवर परिवाराकडून खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध चाळीसगावात दाखल व ‘मविप्र’प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या दिल्ली येथिल सीबीआयच्या पथकाने आज शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील फिर्यादी निलेश भोईटे यांचा जबाब नोंदवून घेतला.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात झवर परिवाराला मदत करण्यासाठी त्रयस्थ इसमामार्फत तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली, अशी फिर्याद सुरज झवर यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर जळगाव जिल्हा मविप्र संस्थेच्या वादात कट रचून संस्थेचे सचिव नीलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवण्यासह इतर बाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली येथून सीबीआयचे अप्पर पोलिस अधिक्षक सशांत याच्यासह दोन अधिकाऱ्यांचे पथक जळगावात आले आहे. आज मंगळवारी या पथकाने जळगावातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी निलेश भोईटे यांचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी त्यांनी मविप्र संस्थेतील वाद देखील जाणून घेतला.
झंवर पिता पुत्रांसह व तत्कालीन तपास अधिकाऱ्याची भेट
आज मंगळवारी अजिंठा विश्रामगृह येथे चाळीसगाव येथे अॅड. प्रवीण चव्हाण याच्यासह इतरांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सुरज झंवर तसेच त्यांचे वडील सुनिल झंवर यांनी सीबीआय पथकाची भेट घेतली. त्यांचा देखील या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जबाब नोंदविन घेतला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, बीएचआर प्रकरणातील तत्कालीन एसआयटीचे प्रमुख असलले पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी देखील सीबीआय पथकाची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.