रावेर (प्रतिनिधी) खान्देशात अक्षयतृतिया म्हणजेच अखजी सणाला विशेष महत्व आहे अखजीला सासरी गेलेल्या माहेरवाशीण माहेरी येतात त्यांच्या पाहुणचारासाठी आमरसाचे विशेष जेवण बनवले जाते माहेरवाशीणीला सासरी परत पाठवणी करताना सोबत शेतातील आंब्यांची भेट दिली जाते. परंतु रावेर तालुक्यातील कोचुर येथील पाटील परिवाराने रोहिणी खडसे यांना आपली कन्या मानून आखजीची भेट म्हणून पाटील परिवाराच्या कोचुर येथील शेतात पिकवलेले सफरचंद भेट दिले आहेत. आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल ना केळीचे माहेर असलेल्या व 40 डिग्री तापमान असलेल्या जळगाव जिल्ह्यात सफरचंद कुठून पिकेल?, पण ही किमया साधली आहे, कोचुर येथील उज्वल पाटील यांनी. त्यांनी आपल्या शेतात सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा अल्पमतांनी पराभव झाल्यानंतर पराभवाने खचुन न जाता त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात समाजकार्य सुरू केले. संपुर्ण मुक्ताईनगर मतदारसंघाला आपले कुटुंब मानून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा रोहिणी खडसे नेहमी प्रयत्न करतात यातून मतदारसंघातील अनेक परिवारांसोबत त्यांचे पारिवारिक ऋणानुबंध तयार झाले असून अनेक परिवार त्यांना आपल्या परिवारातील सदस्य मानुन कन्येसारखे प्रेम देतात. त्यातीलच एक कोचुर येथिल उज्वल पाटिल यांचा पाटील परिवार. कोचुर येथिल प्रगतशील ,प्रयोगशील शेतकरी उज्वल पाटिल यांनी केळी पिकामध्ये सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेऊन पारंपरिक केळी पिकाला पर्याय म्हणून दोन वर्षांपूर्वी आपल्या शेतात सफरचंदाच्या रोपांची लागवड केली होती. लागवडी वेळी रोहिणी खडसे यांच्या हस्ते दोन रोपांची लागवड करण्यात आली होती.
यावर्षी सफरचंदाच्या झाडाला सफरचंद लागले असुन पाटिल परिवाराने अक्षयतृतियेला सफरचंदाची तोडणी करून देवाला नैवद्य वाहिला तसेच रोहिणी खडसे यांच्या हातून लागवड केलेल्या झाडाची सफरचंदाची फळे रोहिणी खडसे यांना अक्षयतृतियेची माहेरची भेट म्हणुन भेट दिली. जळगाव जिल्हाला केळीचे आगार म्हटले जाते इतिहासात जिल्हयात सर्वप्रथम केळीची लागवड रावेर तालुक्यातील कोचुर येथे झाली अशी नोंद आहे म्हणजेच कोचुर हे केळीचे माहेर आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तदनंतर खान्देशात केळी पिक सर्वत्र बहरले केळी पिकाने येथिल शेतकरी बांधवांच्या जिवनात समृद्धी आणली.
परंतु गेल्या पाच सहा वर्षांपासून केळी पिकावर येणारे नवनविन रोग, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे होणारे केळी पिकाचे नुकसान तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटांनी केळी उत्पादक शेतकरी बांधव मेटाकुटीला आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून दिलासा मिळावा म्हणून पारंपारिक केळी पिका व्यतिरिक्त काहीतरी नविन पिकाची लागवड करावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोचुर येथिल प्रगतशील ,प्रयोगशील शेतकरी उज्वल पाटील यांनी मागील दोन वर्षा पूर्वी कोचुर येथे सफरचंदाची लागवड केली. त्यासाठी त्यांनी काश्मिरमधून हरीमन शर्मा यांच्याकडून सफरचंदाची रोपे आणली. सफरचंदाच्या झाडांच्या वाढीसाठी त्यांनी सेंद्रिय खत आणि जिवामृताचा वापर केला.
सफरचंदाच्या झाडांच्या मध्ये टरबूज आणि कांद्याचे आंतरपिक सुद्धा त्यांनी घेतले.यावर्षी सफरचंदाच्या झाडाला सफरचंद लागले आहेत यातून पाटिल परिवाराच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाला यश मिळत असल्याचे दिसते आहे. यासाठी उज्वल पाटिल यांना त्यांचे बंधु संदीप पाटिल,किरण पाटिल, विशाल पाटिल आणि बिएससी कृषीचे शिक्षण घेत असलेले मुले पियुष आणि प्रमोद यांचे सहकार्य लाभले. यावर्षी लागलेल्या सफरचंदाची अक्षयतृतियेला तोडणी करून पाटिल परिवाराने पहिल्या बहाराचा देवाला नैवद्य अर्पण केला .आगामी हंगामा पासुन गोड चवीची सफरचंद बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवता येतील असा पाटिल परिवाराला विश्वास आहे.
रोहिणी खडसे यांनी कोचुर येथे सफरचंदाच्या बागेला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्या म्हणाल्या उज्वल पाटिल यांनी केलेल्या सफरचंद लागवडीच्या प्रयोगाला यश मिळत असल्याचे बघून आनंद वाटतो आहे. 40 डिग्री तापमानात उज्वल पाटिल यांचा खान्देशाच्या मातीत लालचुटुक सफरचंद पिकवण्याचा प्रयोग व्यावसायिक तत्वावर पुर्ण क्षमतेने यशस्वी झाला तर इतर शेतकरी बांधवाना सुद्धा सफरचंद शेतीचा हा प्रयोग मार्गदर्शनपर ठरून पारंपरिक पिकाला पर्याय उपलब्ध होईल. पाटील परिवाराने माझ्या हातून लागवड केलेल्या झाडाची फळे माहेरची भेट म्हणून माझ्यासाठी राखून ठेवले होते आज मला ही माहेरची भेट मिळाली असून खानदेशाच्या कडक उन्हात आपल्या मेहनतीने कष्टाने पाटिल परिवाराने पिकविलेल्या सफरचंदात माहेरचा मायेचा गोडवा जाणवल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.