छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बँकेत केवायसी करून देण्याच्या बहाण्याने पत्नीला एका डोंगराच्या पायथ्याला नेत कात्रीने डोक्यावरील केस कापून नंतर चेहऱ्यावर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची भयावह घटना उघडकीस आली आहे. ही घटना २६ ऑक्टोबरला दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. पत्नीने वेळीच आग विझवल्याने ती वाचली. याप्रकरणी पत्नीने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. रामकिसन माळी (रा. गेवराई), असे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
गेवराई येथील रहिवासी रामकिसन माळी व त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. दि. २६ ऑक्टोबर रोजी रामकिसन हा बँकेत केवायसी करून देण्याच्या बहाण्याने पत्नीला नक्षत्रवाडी – सातारा परिसरात असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन आला. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
पत्नीला मारहाण केल्यानंतर त्याचे एवढ्यावर समाधान झाले नाही, तर त्याने चक्क तिच्या डोक्याचे संपूर्ण केस कापून टाकले. पतीच्या या अमानवी कृत्याने भयभीत झालेल्या पत्नीचा आरडाओरडा सुरू होता; परंतु जवळपास कुणीच नसल्याने असाहाय्य पत्नी ओरडत राहिली. तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर परिसरातील लोक घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत रामकिसन माळी याने तिच्या तोंडावर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि दुचाकीवरून पळ काढला. पत्नीने वेळीच प्रसंगावधान राखून साडीच्या पदाने आगीवर नियंत्रण मिळविले.
नागरिकांनी वेळीच धाव घेत त्या महिलेला वाचवून सातारा पोलीस ठाण्यात दाखल केले. पोलिसांनी तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. ही घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सातारा येथे महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तो चिकलठाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.