नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका नवरीने लग्नाच्या बरोबर एक दिवस आधीच बाळाला जन्म दिला आहे. यानंतर पुढे जे काही घडलं ते समजल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्नाच्या २४ तास आधी नवरीबाई आई झाली आहे. मात्र यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्यातील बडेराजपूर येथे आदिवासी समाजातील लोक राहतात. येथे राहणाऱ्या शिवबत्ती हिचा विवाह ३१ जानेवारी रोजी ओडिशाच्या चंदन नेतामसोबत ठरला होता. लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० जानेवारीला शिवबत्तीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. मात्र, याचदरम्यान अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहीच वेळात समजलं की तिने एका बाळाला जन्म दिला आहे.
बाळ होताच वर आणि वधू पक्षातील मंडळी झाली आनंदी
विशेष म्हणजे बाळ होताच वर आणि वधू पक्षातील मंडळी खूप आनंदी झाली. लग्नासोबत आता बाळ झाल्याने त्याचा आनंद डबल झाला. घरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. याबाबत नवरीची आई सरिता मंडावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजात पैठू प्रथा नावाची एक प्रथा आहे. पैठू प्रथा म्हणजेच एकप्रकारचं लिव्ह इन रिलेशनशिपही म्हणू शकता. या प्रथेमध्ये मुलगी आपल्या कुटुंबीयांना माहिती देऊन आणि त्यांच्या परवानगीने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्नाच्या आधीच राहायला सुरुवात करते.
लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीने दिला बाळाला जन्म
काही वेळ सोबत घालवल्यानंतर म्हणजेच पैठू झाल्यानंतर दोघांचे कुटुंबीय त्यांचं लग्न लावून देतात. या प्रथेतूनच शिवबत्ती २०२१ मध्ये आपल्या आवडीचा मुलगा चंदन याच्या घरी पैठू गेली होती. ते दोघे जवळपास आठ महिने एकत्र राहिले होते. याचा दरम्यान ती गर्भवती राहिली. यानंतर दोन्हीकडच्या मंडळींनी त्यांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आणि लग्नपत्रिका छापली. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीने लग्नाच्या आधीच बाळाला जन्म दिला.