नागपूर (वृत्तसंस्था) जाम प्रकल्पात पोहायला उतरलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दोघे थोडक्यात बचावले. ही घटना ३१ ऑगस्टला दुपारी १२ वाजता घडली. अजय ज्ञानेश्वर कोकर्डे (२५, रा. गणेशपूर, ता. काटोल) असे मृतकाचे नाव आहे.
आदिवासी गाव गणेशपूर येथील अजय कोकर्डे, आकाश राजू उईके (२८) व सुरेश ज्ञानेश्वर उईके (२९) हे गुरुवारी दुपारी कचारी सावंगा येथे कामानिमित्त गेले. काम झाल्यावर कचारीसावंगा येथून घराकडे येताना रस्त्यावरील जाम नदीवरील डोहात तिघेही पोहण्यास पाण्यात उतरले. आकाश उईके व सूरज उईके हे पाण्यातून बाहेर आले. अजय कोकर्डे हा नदीबाहेर आला नाही. दोघांनी अजयला शोधले. परंतु तो मिळाला नाही.
घटनेची माहिती त्यांनी अजयच्या कुटुंबाला व कोंढाळी पोलिसांना दिली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने अजय कोकर्डे याचा शोध सुरू केला. पाच तासांनंतर सायंकाळी सहा वाजता अजयचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला.