सातारा (वृत्तसंस्था) शेतीला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करताना शॉक लागल्याने एकजण जागीच ठार झाला. ही घटना रविवार दि. २७ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
बंडू विष्णू शिंदे ( वय ५६, रा. कोरीवळे) हे रविवारी दुपारी शेतीला पाणी देण्यासाठी पांढरी नावाच्या शिवारात असणाऱ्या विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार चालू करताना त्यांना अचानकपणे शॉक लागल्याने ते बाजूला फेकले गेले. त्यावेळी शिवारातील लोकांना ही बाब निदर्शनास आली. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
याबाबत पोलीस पाटील दादासो शिंदे यांनी पोलिसात खबर दिल्यानंतर मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उत्तम भापकर, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. पाटण येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पो. हवा. डी. एस. मुळगावकर करत आहेत.