कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या आडगाव-कासोदा रस्त्यावरील पिरपरदेशी बाबा दर्गा नजीक मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव-कासोदा रस्त्यावरील पिरपरदेशी बाबा दर्गा नजीक सत्यसिंग शिवाजी पाटील खडके (वय ४६) यांच्या हिरो कंपनीच्या एच.इफ.डीलक्स, मोटरसायकल क्रं. एम.एच.१९ बीबी १५७४ हिला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संबंधित मोटरसायकल स्वार सत्यसिंग पाटील यांना जबर मार लागल्याने ते जागीच गत प्राण झाले. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच कासोदा, आडगाव, व खडके खुर्द येथील ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्पुर्वी आडगाव येथील ग्रामस्थांनी कासोदा पोलिस स्टेशन व १०८ रुग्ण वाहिकेला फोन करून घटनास्थळी बोलावले असता सदर इसम जागेवरच गतप्राण झाल्याचे कळले. ग्रामस्थांच्या मदतीने १०८ चे ड्रॉयव्हर अनिल बोरसे, काशीनाथ राठोड, व पो.कॉ.दिपक अहिरे, दत्तू पाटील यांच्या सहकार्याने कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी आणले असता घातपाताची शक्यता असल्याचे वृत्त पसरल्याने, कासोदा पोलीस स्टेशनला मयताचे आतेभाऊ सुरसिंग नरससिंग पाटील यांच्या फिर्यादी वरून रात्री उशिरापर्यंत अकस्मात अपघात मृत्यूची नोंद करण्यात आली .
याप्रकरणी पुढील तपास सपोनि रविंद्र जाधव, पी.एस.आय. नरेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. भागवत पाटील हे करीत आहेत. सत्यसिंग शिवाजी पाटील यांच्या अपघाताची बातमी कळताच खडके गावांवर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई- वडील, २ बहीण, २ भाऊ, पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. ते सेंटरिंग बांधकाम कामकरून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह भागवत असे, घरातील कर्ता पूरुष गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.