अमळनेर (प्रतिनिधी) या भूमीत आधीच एक जण नंदुरबारवरून नेतृत्व करतो आहे; दुसरा आता जळगाववरून नेतृत्व करण्यासाठी बोलावला गेलाय, मग अमळनेरला हे लोक वाऱ्यावर सोडणार आहेत की काय?— असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी जनतेला उद्देशून करत, यंदा नगरपरिषदेत स्थानिक नेतृत्वालाच संधी द्यावी, अशी विनंती अमळनेरकर जनतेला केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना उमेदवाराची कार्यक्षमता, जनहिताची आवड आणि त्याच्याकडे असलेला वेळ हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्ष हा स्थानिक रहिवासी असावा. कारण २४ तास तत्पर सेवा देणारा व्यक्तीच नगराध्यक्ष म्हणून न्याय देऊ शकतो.
आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा देत त्यांनी स्वतःला घडविले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर असून, विशेष म्हणजे ते स्थानिक असल्याने २४ तास सेवा देऊ शकतील. याशिवाय परिचित चेहरा असल्याने ते नगराध्यक्ष पदासाठी निश्चितच लायक उमेदवार आहेत. सामान्य कुटुंबातील असल्याने जनतेची जाण त्यांना अधिक असेल, यात शंका नाही.
दुसरीकडे विरोधकांनी दिलेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गेल्या कित्येक वर्षांपासून अमळनेर शहराचा रहिवासी नाही. त्यांना अमळनेरमध्ये ओळखत देखील कुणी नाही. डॉक्टर म्हणून ते जळगाव शहरात वास्तव्यास आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण एस.टी. वर्गासाठी निघाल्याने केवळ हौस आणि पद उपभोगण्यासाठीच ते अमळनेर शहरात दाखल झाले आहेत. खरेतर नगराध्यक्ष पद हौसेचे नसून मोठी जबाबदारी असलेले पद आहे. त्यामुळे बाहेरगावाहून उमेदवार “आयात” न करता, स्थानिक व योग्य उमेदवार म्हणून आम्ही जितेंद्र ठाकूर यांची निवड केली आहे.
त्यांना माझे, केंद्रातील खासदार स्मिताताई वाघ यांचे तसेच अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शन सतत लाभणार आहे. त्यामुळे त्यांना निवडून दिल्यास कुणाच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हे निश्चित.
मुळात विरोधी माजी आमदारांना अमळनेरवर प्रेमच दिसत नाही. दोनदा बाहेरचे म्हणून नाकारल्यानंतरही, मुद्दाम स्थानिकांवर खुन्नस म्हणून त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी बाहेरगावचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीचा काळ वगळता हे स्वतः नंदुरबारहून दोन-दोन महिने अमळनेरला येत नाहीत. आणि त्यांचा दिलेला उमेदवार नगराध्यक्ष झाल्यास तोही दोन-दोन महिने डोळ्यांना दिसणार नाही मग आमची नगरपालिका वाऱ्यावर सोडायची का?
याचा विचार अमळनेरकर जनतेने करून, स्थानिक उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करावेत, अशी विनंती वजा आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.













