चोपडा (प्रतिनिधी) शहरातील लोहाणा पेट्रोलपंपाजवळील बापु टी हॉऊससमोर एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची बॅग लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५ रा. गरताड ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ मे २०२२ रोजी सांयकाळी अंदाजे ४.३० ते ५ वाजेच्या दरम्यान चोपडा शहरातील स्टेट बँक शाखा येथील बँक खात्यातुन चेकद्वारे काढलेले ५ लाख रुपये केशरलाल यांनी एका कापडी पिशवी ठेवले होते. केशरलाल ही पिशवी घेवून उभे असतांना त्यांच्या जवळ एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० वर्ष हा आला आणि तुमच्या मानेवर मुंग्या आहेत, असे सांगितले. यावेळी केशरलाल हे मानेवर पाणी टाकत असतांनाच त्या व्यक्तीने दुचाकीवरील पैशांची बॅग उचलून पळ काढला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.