भुसावळ (प्रतिनिधी) Any Disk Remote Destop हे अॅपलिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याचे सांगून तसेच फ्लिपकार्ट कंस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून दीपनगर येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची ८९ हजार ९९६ रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात विकास बाबूलाल राठोड (वय ४५ रा. टाईप ३,१०/५६ दिपनगर ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ मे २०२२ रोजी ४.१५ वाजेच्या सुमारास मोबाईल क्र. ९००२१२६१२७ या वरील अज्ञात व्यक्तीने विकास राठोड यांना Any Disk Remote Destop हे अॅपलिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर विकास राठोड यांची दिशाभूल करुन डेबीट कार्डची संपूर्ण माहिती घेतली. तसेच विकास राठोड यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडीया, शाखा दिपनगर या ब्रँचच्या खात्याचे डेबीट कार्डतून फ्लिपकार्ट कंस्टमर केअरमधून बोलत आहे असे खोटे सांगून डेबीट कार्डचा नंबर वापरुन ८९ हजार ९९६ रुपयाची पैसे डेबीट करुन ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास शेंडे हे करीत आहेत.