जळगाव (प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकार १० मार्चनंतर कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटलांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोपर्यंत हे सरकार पडणार नाही, असं खडसे म्हणाले.
एकनाथराव खडसे म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. सत्ता नसल्यामुळे ते दुखी आहेत आणि त्यांना वन-वन फिरावे लागतेय. त्यामुळेच ते अशी विधान करत आहेत. तसेच पाटील हे उत्तम भविष्यकार असल्याचा टोला देखील एकनाथ खडसेंनी लगावला.
विरोधक मनाचे मांडे खात आहेत
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा विरोधकांनी तारखा जाहीर देखील केलेल्या आहेत. मात्र तसे झाले नाही. कारण नसताना कोणतेही सरकार पडत नाही. त्यासाठी ठोस कारण हवे असते. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोपर्यंत हे सरकार पडणार नाही. जरी सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवाने सरकार पडलेच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार. असा विश्वास देखील खडेंनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
महाविकास आघाडीवर निशाणा साधत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत. आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगात जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागेल. त्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.