जळगाव (प्रतिनिधी) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैशाली हिंगे यांनी केले आहे.
आरक्षित जागेवर प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज सादर केल्यानंतर तीन ते पाच महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समितीकडून निर्णय घेतला जातो. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला पुरेसा अवधी मिळणे आवश्यक असते. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी वंचित राहू नये, यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यानी अद्यापही वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्याना तात्काळ समितीकडे अर्ज सादर करावेत.
ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचेही श्रीमती हिंगे यांनी म्हटले आहे.
गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव कार्यरत आहे. इयत्ता १२ वी विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी मागासप्रवर्गातुन नियुक्त असणारे अधिकारी/कर्मचारी, मागास प्रवर्गातून निवडणुक लढविणारे उमेदवार इत्यादीना जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करुन अर्जदारांना ऑनलाईन पध्दतीने वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरीता शासन ऑनलाईन सुविधा १ ऑगस्ट २०२० सुरु करीत आहे. मात्र यावर अर्ज करतांना उमेदवारांना अनेकदा अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता मोफत मार्गदर्शन शिबिर २९ जुलै, २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता गुगल झुम ॲपवर होणार असून याचा मिटींग आयडी ८८३१५४८२८३४ असा असून पासवर्ड OcU३Qg हा आहे.
यावेळी अर्ज सादर कसे करावे, अर्ज सादर करतांना सोबत कोणते दस्ताऐवज सादर करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पॉवर पाईट प्रेझेटेशनव्दारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी विद्यार्थी, पालक, इंटरनेट कॅफे व्यावसायिक इत्यादीनी या बेबीनारमध्ये सहभागी होवुन मार्गदर्शन घ्यावे. असे आवाहन अध्यक्ष प्रकाश वायचळ, उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी. यु. खरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे