पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
संजय रमेश शर्मा असं अटक केलेल्या ५२ वर्षीय शिक्षकाचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेतो. तर १५ वर्षीय पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी येत होती. दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी आरोपी शिक्षक पीडितेला इमारतीच्या छतावर घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला आहे.
घाबरलेल्या पीडित मुलीने घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. यामुळे आरोपी शिक्षकाची देखील हिंमत वाढली. ३ ऑगस्ट रोजीच्या घटनेनंतरही आरोपीनं पीडितेला अनेकदा छतावर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. ३ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबरपर्यंत जवळपास तीन महिने आरोपी शिक्षक पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.