चंद्रपूर (वृत्तसंस्था) नागभीड तालुक्यातील एका शाळेत कार्यरत शिक्षकाने दहा वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. रवींद्र पांडुरंग नन्नावरे (५६), असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागभीड येथील रहिवासी असलेला हा शिक्षक तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास खेळण्याच्या सुटीदरम्यान त्याने १० वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढून तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पालकांनी थेट तळोधी (बा.) पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षक रवींद्र नन्नावरे याच्याविरुद्ध कलम ३५४ अ भांदवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शिक्षक फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेने गावात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तत्काळ या शिक्षकाला सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.