भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशात कार्यरत असणाऱ्या एका सहाय्यक अभियंत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला रविवारच्या सुट्टीसाठी एक विचित्र पत्र लिहिले आहे. या अभियंत्याने लिहिले की, त्याला त्याच्या मागील जन्मातील गोष्टी आठवल्या आहेत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे त्यांचे मागील जन्मातील मित्र नकुल होते तर आरएसएस प्रमुख मोहन भागवत शकुनी मामा होते. या विचित्र अर्जाची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
राजकुमार यादव असे या उपअभियंत्याचे नाव आहे. राजकुमार मध्यप्रदेशातील आगर माळवाच्या सुस्नेर पंचायतीमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. राजकुमार यादव यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजेसाठी अर्ज लिहिला आहे. यादव यांनी प्रत्येक रविवारी कोणत्याही प्रकारे कामाच्या ठिकाणी उपस्थित राहता येत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे.
नेमकं काय लिहिले अर्जात?
राजकुमारने अर्जात लिहिले, “मी रविवारी जिल्ह्याच्या कोणत्याही कामाला उपस्थित राहू शकणार नाही. कारण आत्मा अमर आहे हे मला काही दिवसांपूर्वी समजले आहे. मला माझ्या मागील जन्माचीही जाणीव झाली आहे. असदुद्दीन ओवैसी हे माझे पहिले जन्मलेले मित्र नकुल आणि मोहन भागवत शकुनी मामा होते. म्हणूनच मला माझे जीवन जाणून घेण्यासाठी गीता वाचायची आहे. दर रविवारी मी माझ्यातील अहंकार मिटवण्यासाठी भीक मागून घरोघरी गव्हाचे धान्य गोळा करेन. हा माझ्या आत्म्याचा प्रश्न आहे. मला समजते की प्रत्येक रविवारी मला सुट्टी देऊन तुम्हाला आनंद होईल.” उपअभियंताचे हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे.