पाचोरा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न – बाजार समितीच्या जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला तारण दिलेल्या विवादित जागेचा ताबा बँकेस मुदतपूर्व दिल्याबद्दल आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत केलेल्या मागणीनुसार पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निलंबित करण्यात आले आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्जापोटी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला तारण दिलेली जागा ही डी.आर.डी. कोर्टाने बँकस ताब्यात देण्यासंदर्भात निकाल जाहीर केला होता. या प्रकरणी अपील करण्यासाठी बाजार समितीला मुदत दिली होती. या मुदतीच्या पूर्वीच पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी सदर बॅकस जागा ताब्यात दिली होती.
या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न उपस्थित करीत सदर तहसीलदार यांनी बेकायदेशी कामकाज केले आहे, म्हणून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. यावरून पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन केल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. दरम्यान, सदर विवादित जागा ही जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला तारण दिलेली असून बँकेचे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नऊ कोटी रुपये थकीत आहेत.