जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तीन मित्रांनी दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केल्या. १७ वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे. जाचास कंटाळून जळगावाती दोघा मित्रांसह अन्य एका मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. तसेच या घटनेची सीआयडी चौकशी करुन न्याय देण्याची मागणी पालकांनी जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनंतर शिक्षकाचीही आत्महत्या !
जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपजवळ राहणाऱ्या एका खासगी शिक्षकाने राहत्या घरात सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. परंतु विद्यार्थ्यां आणि शिक्षक आत्महत्या या एकमेकांशी जुळलेल्या आहेत का?, यामागे नेमकी काय कारणे आहेत? याचीच चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू असून या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील होत आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे आणि लवकरच यामागे काय कारणे आहेत ती समोर येतील.
- संदीप गावित (उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव)
माझ्या मुलाला कुठलेही व्यसन नव्हते. त्याची घरात कुठलीही मागणी न होती. त्यामुळे तो आत्महत्या करू शकत नाही. त्याला कोणीतरी आत्महत्या प्रवृत्त केलेले आहे. याची सखोल सीआयडी चौकशी झाली पाहिजे.
- मयत पालकाचे वडील
शहरात एका मागून एक विद्यार्थी आत्महत्या करतात.त्यानंतर शिक्षकही आत्महत्या करतोय. सगळं प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलिसांनी याची सखोल चौकशी केलीच पाहिजे.विद्यार्थीचे मार्क चांगले होते. घरात कुठलाही तणाव नव्हता. तरीही या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे या आत्महत्यांमधील कारणे उघड झालीच पाहिजे. जळगाव शहरातील पालक यामुळे प्रचंड तणावात आहेत.
- मयत विद्यार्थ्यांच्या पालकाचे मित्र