कोलकाता वृत्तसंस्था । अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर बसु यांचे गुरुवारी पहाटे 4.50 वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. बसु यांना 2014 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते कोरोना शिवाय किडनीच्या अजारानेही त्रस्त होते, असे पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे. डॉ. बसू, हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणु उर्जा कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी हायली कॉम्प्लेक्स रिअॅक्टरदेखील सुरू करण्यात आले होते.