धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी ते तरसोद नवीन बायपास रस्त्यावर रविवारी रात्री तिहेरी वाहनांचा भीषण अपघात झाला. रात्री सुमारे १०.४५ वाजता घडलेल्या या अपघातामुळे जवळपास ४५ मिनिटे रस्ता बंद राहिला. या घटनेत दोन वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर एक ट्रक उभा असताना, जळगावकडून पाळधीकडे येणारा दुसरा ट्रक या नादुरुस्त ट्रकवर जोरात आदळला. धडकेनंतर हा ट्रक पुढे जळगावकडे जाणाऱ्या टँकरवर जाऊन आदळला. या भीषण अपघातात ट्रक चालक सोनुकुमार गिरी (रा. उत्तर प्रदेश) व टँकर चालक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पाळधीचे एपीआय प्रशांत कंडारे यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. महामार्ग पोलिस विभागाचे अभिलाष सूर्यवंशी, दीपक सुरवाडे, सुनील नाईक तसेच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. धरणगाव बायपासवर सुरूवातीपासूनच अपघातांची मालिका सुरू असून, आठवड्यातील हा दुसरा अपघात आहे.
















