परभणी (वृत्तसंस्था) परजातीय मुलाशी प्रेमविवाह करण्याच्या तयारीत असलेल्या पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ठार मारले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेहही जाळून टाकला. ‘ऑनर किलिंग’ची ही खळबळजनक घटना तालुक्यातील न्हावा येथे नुकतीच घडली. याप्रकरणी खून झालेल्या तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून, अन्य आठ आरोपींवर पालम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणी प्रियकराशीच लग्न करण्यावर होती ठाम !
पालम तालुक्यातील नाव्हा येथील १९ वर्षीय युवतीचे गावातील एका परजातीय युवकाशी प्रेमसंबंध होते. त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा होती, परंतु आई-वडिलांनी त्यास विरोध केला. तिचे अन्यत्र लग्न लावून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु ती प्रियकराशीच लग्न करण्यावर ठाम होती. अखेर आपल्या विरोधास मुलगी जुमानत नाही हे पाहून २१ एप्रिलच्या रात्री आई-वडिलांनी तिचा खून केला आहे. त्याच रात्री कोणालाही थांगपत्ता लागू न देता इतर नातेवाईकांना सोबत घेऊन त्यांनी तिचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट केला.
वडिलांना अटक, आठ जणांविरुद्ध गुन्हा !
या घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाचे कलम ३०२, २०१, २०२ आणि ३४ अन्वये मृत तरुणीचे वडील बाळासाहेब भीमराव बाबर, आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर, अच्युत दत्तराव बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, आबासाहेब रुस्तुमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक शिंदे या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला, तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे करीत आहेत.
एक वर्षापासून होते प्रेमप्रकरण !
या १९ वर्षीय मुलीचे गावातील एका युवकासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. याची माहिती घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला आणि घरच्यांनी तिच्या लग्नासाठी स्थळ शोधले. यावेळी तिने प्रियकरासोबतच लग्न करणार आहे माझ्यासाठी मुलगा शोधू नका, असे आई-वडिलांना सांगितले. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी नात्यातील एका युवकासोबत घरच्यांनी तिचे लग्न जमवून टिळ्याचा कार्यक्रमही केला होता. गुरुवारी नाव्हा येथे मुलीचे लग्न ठरले होते. आई-वडील इच्छेविरुद्ध बळजबरीने लग्न करीत असल्याने ती कोणालाही न सांगता १५ एप्रिल रोजी प्रियकरासोबत पळून गेली होती.
गोड बोलून गावाकडे आणले आणि केला खून !
मुलीच्या आई-वडिलांनी मुलाच्या घरी जाऊन मुलीला परत आणा नाहीतर तुमच्यावर पोलीस केस करतो, अशी धमकी दिली. दोघांचा शोध घेतला असता ते दोघे लातूर येथील मुलाच्या नातेवाईकांकडे आढळून आले. त्यानंतर त्या दोघांना गंगाखेड येथे आणण्यात आले. गंगाखेड येथे दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांची बैठक झाली. यावेळी मुलीने प्रियकरासोबतच लग्न करणार, असे ठाम सांगितले. यावेळी मुलीला गोड बोलून गावाकडे आणण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिल रोजी रात्री तिला जीवे मारून १ वाजेपर्यंत गावातील स्मशानभूमीत तिच्या मृतदेहास मूठमाती देण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यात आला.