वर्धा (वृत्तसंस्था) घरची परिस्थिती जेमतेम, कुटुंबाचे पोट भरेल एवढं अन्न देखील घरात नाही. तशात काही महिन्यांपासून आजारी असलेल्या मुलीचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराला पैसे कुठून आणायचे?, अशा विवंचनेत सापडलेल्या परिवाराने चक्क घरातच खड्डा खणून वेडसर बहिणीचा मृतदेह पुरल्याची हृदयद्रावक घटना सेवाग्राम येथील आदर्श नगर भागात घडली. तब्बल दिवसांनंतर १३ रोजी उघडकीस आल्यानंतर मात्र, परिसरात एकच खळबळ उडाली. प्रविणा साहेबराव भस्मे (वय (३७, रा. आदर्शनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर सेवाग्राम पोलिसांनी वडील साहेबराव चिंदुजी भस्मे (६८), आई मंदा साहेबराव भस्मे (६४), भाऊ प्रशांत साहेबराव भस्मे (३५) यांना ताब्यात घेतले.
अंत्यसंस्काराकरिता पैसे नसल्याने घरातच खड्डा करून मृतदेह पुरविला !
सेवाग्राम येथील आदर्श नगर भागात भस्मे परिवार वास्तव्याला आहे. त्या परिवारात ६७ वर्षीय व्यक्ती, ६० वर्षीय पत्नी, ३७ वर्षीय मुलगी व ३२ वर्षीय मुलगा असे चार सदस्य होते. घरचा कर्ता पुरुष हा रोजमजुरी करायचा. घरी खाण्याकरिता अन्न नाही. कोणत्याही सोयीसुविधा नाही. त्यामुळे हा परिवार कुपोषित राहिला. उपासमारीमुळे या परिवाराचे मानसिक संतुलन बिघडले व मनोरुग्ण परिवार म्हणून गावात ओळखले जाऊ लागल्याची चर्चा घटनास्थळी होती. काही महिन्यांपूर्वी परिवारातील ३७ वर्षीय तरुणी प्रविणाची प्रकृती बिघडली. तिला कोणताही उपचार न मिळाल्याने ३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. काही दिवस मृतदेह परिवारातील सदस्यांनी मृतदेह घरातच ठेवला. परंतू ४ जुलै रोजी मात्र, पैसे नसल्याने घरातच खड्डा करून अंत्यसंस्काराकरिता मृतदेह पुरविला. घरात काहीही घडले नसल्याप्रमाणे सारे वावरत असल्याने कुणालाही तिच्या मृत्यूची वार्ता समजू शकली नाही.
शेजाऱ्यांना शंका आल्यानंतर समोर धक्कादायक वास्तव !
परंतू मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले होते. घरात रोज येणारा तरुणीचा आवाज का येत नाही म्हणून घरात मृत्यू झाल्याची शंका शेजाऱ्यांना आली. या सर्व घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना 13 जुलैच्या दुपारी मिळाली. चौकशी केल्यावर तरुणीचा मृत्यू झाला व तिला घरातच पुरविले, अशी कुनकुन गुरुवार, १३ जुलै रोजी सेवाग्राम पोलिसांच्या कानी पडली. पोलिसांनी आपली यंत्रणा सतर्क करून शोध घेतला तेव्हा धक्कादायक सत्य पुढे आले. सेवाग्रामचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटकर जमादार सुनील पाऊलझाडे व इतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घरातच काहीतरी पुरविले आहे याचे पुरावे पोलिसांना पाहता आले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्या तरुणीच्या वडिलांसह भावाला सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेऊन सेवाग्राम ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी अंत्यसंस्काराकरिता पैसे नसल्याने मृतदेह घरातच पुराल्याचे त्याने सांगितले.
मृतदेह पुरलेल्या जागेवर पाट्या टाकून झोपायचे वडील !
वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत यांना पोलिसांनी प्रविणा- बाबत विचारपूस केली असता, प्रविणाला घरातच पुरल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी प्रविणाचे घर गाठत पाहणी केली असता मृतदेह पुरलेल्या ठिकाणी मातीवर १० लाकडी पाट्या आणि त्यावर दगड, विटा ठेवल्याचे दिसून आल्याचे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी सांगितले. भस्मे कुटुंबातील सर्वच सदस्य वेडसर प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलगी प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्यावर लाकडी पाट्या टाकून वडील साहेबराव त्यावर झोपायचा. त्याच्या बाजूलाच भाऊ पलंगावर झोपायचा. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री 7 वाजता फॉरेन्सिक टीमसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर घरातील खड्ड्यात पुरलेला महिलेचा मृतदेह खड्ड्याबाहेर शवविच्छेदन केले. त्यानंतर जवळच्याच स्मशानभूमीत मृदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.