जळगाव (प्रतिनिधी) संजिवनी फाऊंडेशन संचलित ‘परिवर्तन’ संस्थेतर्फे ‘वाचन संस्कृती समृद्ध करू यात’ या ब्रीदवाक्याला घेऊन दरवर्षी साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पाच दिवसीय अभिवाचन महोत्सव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत ऑनलाईन व साहित्य अभिवाचन महोत्सव घेण्यात येणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात साहित्यिकांच्या चर्चासत्राने होणार आहे. यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, जेष्ठ कादंबरीकार प्रविण बांदेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी जयंत पवार लिखित “तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य” या कथेचं अभिवाचन अतुल पेठे हे करणार आहेत. २८ फेब्रुवारी रोजी बंगाली साहित्यात व जागतिक स्तरावर गाजलेल्या बिभुतीभूषण बंदोपाध्याय लिखित “पाथेर पांचाली” या कादंबरीचे अभिवाचन, दि १ मार्च रोजी शंभू पाटील लिखित “गांधी नाकारायचा आहे पण कसा?” या नाटकाचे अभिवाचन तर दि. २ मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी अशोक कोतवालांची कविता परिवर्तनचे कलावंत सादर करतील. दि. ३ मार्च रोजी चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘आमचा पोपट वारला’ या कथेचं अभिवाचन अतुल पेठे करतील. महोत्सवाचा समारोप दि. ४ मार्च रोजी भाषा संस्कृतीवरील चर्चेने होणार आहे. या महोत्सवामध्ये राज्य भरातील कलावंत व लेखक सहभागी होणार आहेत.
संजीवनी फाउंडेशन संचलित परिवर्तनच्या माध्यमातून भाषा संवर्धनासाठी विविध प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाचं वर्ष हे दशकपूर्तीचं वर्ष आहे. या ऑनलाईन अभिवाचन महोत्सवाचा लाभ रसिकांना घरबसल्या घेता येणार आहे, त्यासाठी लिंक रसिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महोत्सवासाठी मायटी ब्रदर्सचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सव प्रमुख विनोद पाटील, प्रा. मनोज पाटील, नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, होरिलसिंग राजपूत, राहुल निंबाळकर, वसंत गायकवाड, मंगेश कुलकर्णी, डॉ. किशोर पवार, प्रतिक्षा कल्पराज, मोना निंबाळकर आदी प्रयत्न करीत आहेत.