पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबांचे दर्शन घेऊन आलेल्या ५ अल्पवयीन मुलांना धरणात असलेल्या पाण्यात पोहोण्याचा मोह झाला. त्यानंतर हे पाच बालक पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोघे पाण्यातून बाहेर आल्याने ते बचावले. ही घटना ३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ तर एक त्यांचा मालेगाव येथील आतेभाऊ आहे.
शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहणारे मोहम्मद एजाजनी मोहम्मद मोमीन (वय १२), मोहम्मद हसन लियाज मोहम्मद मोमीन (वय १६), आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील आवेश रजा मोहम्मद जैनोद्दीन (वय १७) हे पाचही बालक ३ रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान घरातून पारोळ्यापासून ४ किमी अंतरावरील भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १६), इमाम रजा न्याज मोहम्मद न्याज (वय १४) तर आवेश रजा शहा मोहम्मद जैनोद्दीन (वय १७) हे तिघे धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. तर अन्य दोघे बालक धरणाच्या कमी पाण्यात पोहायला उतरले. विशेष म्हणजे या पाचही बालकांना पोहोता येत नव्हते. परंतु, केवळ किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
यानंतर एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून हसन रजा न्याज मोहम्मद न्याज, इमाम रजा न्याज मोहम्मद न्याज व आवेश रजा शहा मोहम्मद जैनोद्दीन हे बुडाले. तर दोघे कमी पाण्यात उभे असलेले आश्रम पीर मोहम्मद, इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते त्यांना वाचवू शकले नाहीत. त्यानंतर या दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली व घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. यानंतर तेथील नागरिक व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यातील मृत बालकांना पारोळा कुटीर रुग्णालयात आणल्यानंतर डॉ. प्रशांत रनाडे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले.
कुटुंबीयांचा काळीज चिरणारा आक्रोश !
या तीघांमध्ये हसन, एजाज हे दोघे सख्खे भावंड होते. तर आवेश हा त्यांचा आते भाऊ होता. पारोळ्यात ३१ रोजी मिश्किल शहा बाबांचा संदल असल्याने आवेश हा पारोळा येथे आला होता. हसन हा धरणगावातील उर्दू शाळेत बारावीत शिकत होता. तर एजाजने आठवीनंतर शाळा सोडली होती. मालेगाव येथील भावेश हा देखील शाळा सोडून वडिलांच्या कामात हातभार लावत होता. हसन यांचे नातेवाईक आजारी असल्याने परिवारातील सर्व ज्येष्ठ हे मुंबईत गेले होते. घरी फक्त महिलाच होत्या. घटनेचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. इजाज, हसन यांची घरची ची परिस्थिती हालाखीची आहे.