मुंबई (वृत्तसंस्था) : प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
काल (शनिवारी) सकाळी राडा झाला होता. त्यानंतर समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारी झाली.याप्रकरणी ठाकरे गटातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध दादर पोलिस घेत आहेत. पाच जणांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.
या राड्याच्या वेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात शनिवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मध्यरात्री दादरमध्ये मारहाण केली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता थोडक्यात वाचला, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. शनिवारी सकाळी प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची रस्त्यावर हाणामारी झाली, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी दावे-प्रतिदावे केले आहे. आमदार सरवणकरांनी आरोप फेटाळले आहेत.