जळगाव (प्रतिनिधी) मागील तीन-चार महिन्यांपासून काही किरकोळ अपवाद वगळता मोठ्या संख्येने पात्र असलेल्या व निकष पुर्ण केलेल्या सर्व सामान्य केळी उत्पादकांना त्यांच्या हक्काच केळी पिक विम्याचे पैसे दोन दिवसात अदा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांनी केली आहे.
जिल्ह्यातील तिन्ही मंत्री दोन्ही खासदार यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितले होते की, डिसेंबर पर्यंत केळी पीक विम्याचे पैसे मिळतील. परंतु फेब्रुवारी उजाडला तरी हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. मंत्र्यांकडून विमा कंपन्यांना तंबी का दिली जात नाही?, असा सवालही जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार यांनी विचारला आहे.
केळी हे नाशवंत फळ असल्याने शेतकरी ते ठेवू शकत नाही याचा गैर फायदा केळी व्यापारी घेत असून केळीचे भाव पाडण्याचे काम त्यांच्याकडून सुरु असते. बाजारात दहा रूपये किलो प्रमाणे कोणतेच फळ मिळत असतांना शेतकऱ्यांच्या केळीची १ जार रूपये प्रति क्विंटलने खरेदी केली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला किलोला फक्त दहा रूपये भाव मिळत आहे.
गुजराथ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश प्रमाणे केळीला प्रतिझाड प्रमाणे सबसिडी मिळवी, टिशू रोपांना अनुदान मिळावे, केळी निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज व पॅक हाऊस करिता शेतकऱ्यांना कमी निकषांनी जास्तीत जास्त अनुदान मिळावे, केळी उत्पादक तालुक्यातील बाजार समित्यांना कोल्ड स्टोरेज प्राधान्याने द्यावीत. इतर पिकांप्रमाणे केळी मल्चिग पेपरला अनुदान द्यावे, करपा सीएमव्ही रोग ग्रस्त केळी उत्पादक शेतकन्यांना मदत द्यावी, शालेय पोषण आहारात केळीचा समावेश व्हावा, अश्या विविध मागण्या देखील विकास पवार यांनी केल्या आहेत.