जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला गळती लागली आहे. आता भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत. त्याचं कारण म्हणजे आमदार संजय सावकारे यांच्या पोस्टरवर झळकलेला खडसेंचा फोटो.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात आणखी धक्के देण्याचा इशारा खडसेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपला दिला आहे. त्यामध्ये आता एका आमदाराचा समावेश झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या आमदाराने जाहीरपणे याचे संकेतच दिले आहे. भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात. पण, यंदा जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही. भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही हातात घड्याळ बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच सावकारेंच्या वाढदिवशी झळकलेलं पोस्टर राजकीय वर्तुळात कुजबूज वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खानदेशातील मोठे नेते म्हणून ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या हातावर घड्याळ बांधले. त्यानंतर भविष्यात अनेक उलथापालथी होतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. अनेक खडसे समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेश केला, तर काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. २००९ मध्ये एकनाथ खडसे यांच्या वरदहस्ताने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढवून जिंकून आले होते. आता एकनाथ खडसे यांनी हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकनाथ खडसे असतांना त्यांचे निकटवर्तीय असलेले संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये जाणार का ? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.