मुंबई (वृत्तसंस्था) भोंग्यावरून राज्यात वातावरण तापलं असून परराज्यांतून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नरज असणार आहे. राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या लोकांवर पोलिसांची नजर असणार आहे.
दंगल घडविण्याचा कट असल्याने यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमकही सज्ज आहे. तर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावू यावर मनसे ठामच असल्याने मनसे नेत्यांचीही धरपकड सुरु आहे . मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास आंदोलन सुरुच राहील, अशी धमकी राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यालयात स्टँडबायवर ठेवले आहेत. दरम्यान, मनसेच्या आंदोलनासंदर्भात आतापर्यंत शहरात एकूण 7 गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.