नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी युक्रेनसोबतचा तणाव संवादानं सोडवण्याचं आवाहन केलं.
नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असं या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलंय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.
‘लोकशाही मार्गाने आणि चर्चेमधून वाटाघाटी करुन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’ असंही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलताना सांगितल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे. युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या देशांमधील अधिकारी आणि संबंधित व्यक्ती या प्रकरणासंदर्भात सतत संपर्कात राहतील यावर शिक्कामोर्तबही केल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दूतावासाने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लष्करी कायदा लागू झाल्याने तिथे वाहतुकीत अडथळे येत असल्याने घरीच थांबण्याचे आवाहन दूतावासाने भारतीयांना केले. आपल्याला मायदेशी परत पाठविण्यासाठी दूतावासाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तोपर्यंत घरातच थांबा, तसेच जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आसरा घ्या, अशी सूचना राजदूतांनी केली.