नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आपण कोरोना लसीकरणाच्या नादात कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच येत्या ११ ते १४ एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय लढायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. ७० टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळायला हवी. यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.