नशिराबाद (प्रतिनिधी) मन्यारखेडा शिवारातील दूरदर्शन टॉवरसमोरील पडीक भागातील एका घरावर नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली. या कारवाईत पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांनी सापळा रचून डमी ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी दूरदर्शन टॉवरसमोरील पडीक भागातील घरावर छापा टाकून सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस आणला.
या प्रकरणात कुंटणखाना चालक चेतन माळी (रा. स्वामी समर्थ शाळेजवळ, कुसुंबा, ता. जळगाव), राम विश्वास बोरसे आणि श्याम विश्वास बोरसे (दोघे रा. साईप्रसाद कॉलनी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) तसेच कुंटणखान्यात आलेला एक पुरुष या चौघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही धाड सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रवींद्र तायडे, संजय महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गायकवाड, सागर बिडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार, युगंधरा नारखेडे, मोनाली दहिभाते आदींच्या पथकाने केली. या कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी घातलेला आळा पुन्हा अधोरेखित झाला असून, स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
















