सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केल्याने, संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांनी मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी, दीपक पोपट सुतार (रा. माची पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख चार हजार रुपये किमतीची बंदूक जप्त केली आहे. या प्रकरणी स्वत: उदयनराजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, खा. उदयनराजे यांच्या जल मंदिर या निवासस्थानातील शयनकक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली चांदीची शोभेची बंदूक दि. 9 रोजी चोरीस गेली. याबाबत स्वत: उदयनराजेंनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज आणि खासदारांच्याच घरात चोरी झाल्याने पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी दोन पथके तयार केली. दरम्यान, एक चोरटा शहरातील एका सराफाकडे चोरीची बंदूक विकायला येणार असल्याची माहिती सपोनि विशाल वायकर यांना मिळाली. त्यांनी पोलिसांचे पथक साध्या वेशात सराफाच्या दुकानाबाहेर तैनात केले. चोरटा दुकानात गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर ती बंदूक जल मंदिरातून चोरल्याची कबुली त्याने दिली. हवालदार लैलेश फडतरे तपास करत आहेत.