जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सुप्रसिध्द भजे गल्लीत हॉटेल साई गजानन पॅलेसच्या तळमजल्यावरील खोलीत सट्टा जुगार अड्ड्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलीस पथकाला एका खोलीत एक तरुणी, एक तरुण आणि महिला आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, या हॉटेलमध्ये सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पथक कारवाई साठी गेले होते. शहरातील बसस्थानक शेजारी गजबजलेल्या भागात हॉटेल साई गजानन पॅलेज, लॉजिंग आहे. या हॉटेलातील तळमजल्यावर असलेल्या खोलीत सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी खात्री करण्यासाठी कर्मचार्याला पाठविले. मात्र, तेथे सट्टा खेळताना कुणीही आढळून आले नाही. संबंधित हॉटेलातील तळमजल्यावर खोलीत तरुण, तरुणी व एक दोन मुले असलेली एक महिला मिळून आली. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक किशोर पवार, योगेश साबळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. मिळून आलेल्या तरुण तरुणी व महिलेला ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले. तर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनीही संबधित घटनास्थळाला भेट देवून सीसीटीव्ही तपासले. यात ताब्यात घेतलेले तरुण, महिला व तरुण संबंधित तळमजल्यावर खोलीत प्रवेश करतांना दिसून येत आहे. हॉटेलला पोलिसांनी कुलूप ठोकले असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.