जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा परिसरातील कुंभारवाडा परिसरातील घरामध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. याठिकाणाहून चार पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये दोन परप्रांतीय महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या छाया पितांबर बैरागी (रा. कुंभारवाडा, पिंप्राळा), कल्पेश अशोक राजपूत (वय २८, रा. दादावाडी) व जयराम संतोष वंजारी (वय २५, रा. किनगाव, ता. यावल) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा भागातील कुंभार वाडा परिसरातील छाया बैरागी ही तिच्या राहत्या घरात कुंटणखाना चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला व १५०० रुपये देऊन डमी ग्राहकाला सदर ठिकाणी पाठविले. तेथे गेल्यानंतर त्याने मिसकॉल देताच सापळा रचून बसलेल्या डीवायएसपी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतनहरी गिते, रवींद्र मोतीराया, महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी घरावर छापा टाकला. तेथे पश्चिम बंगाल, सुरत व स्थानिक दोन महिला आढळल्या. पोलिसांनी त्या महिलांची सुटका केली तर तेथे असलेला एक ग्राहक पळून गेला.
कुंटणखाना चालविणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता बाहेरुन महिलांना आणून त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या छाया पितांबर बैरागी (रा. कुंभारवाडा, पिंप्राळा), कल्पेश अशोक राजपूत (वय २८, रा. दादावाडी) व जयराम संतोष वंजारी (वय २५, रा. किनगाव, ता. यावल) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















