वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) सावतर निंभोरा येथील तापी नदीच्या काठावर झुडपात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर वरणगाव पोलिसांनी धाड टाकून ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी रोशन कैलास कोळी (वय २८, रा. सावतर निंभोरा) यास अटक करण्यात आली आहे.
वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक ईश्वर तायडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सावतर निंभोरा शिवारातील तापी नदीकाठी झाडाझुडपात गावठी दारू तयार केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी १० रोजी दुपारी ३.३० वाजता कारवाई करत दारु भट्टीवर छापा टाकला. या वेळी गावठी हातभट्टीची २ हजारांची २० लिटर तयार दारू, ५० हजारांचे १ हजार लिटर कच्चे रसायन (गुळ, मोह, नवसागर मिश्रण), अंदाजे ३०० लिटर, दारू तयार करण्यासाठी वापरलेले ३ ड्रम असा एकूण अंदाजे ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. अमितकुमार बागुल यांच्या आदेशाने पो.कॉ. गणेश राठोड करत आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करुन गावठी दारूविरोधात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
















