जळगाव (प्रतिनिधी) मला एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने सांगितले की,स्थानिक गुन्हे शाखेतील एक कर्मचारीच्या माध्यमातून तुमच्याविरुद्ध मोठं षड्यंत्र रचले जात असून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाणार आहे, अशा आशयाचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव दुध संघाच्या विषयावरून मागील दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यातील राजकारण तापलेले आहे. दुध संघातील गुन्हा दाखल व्हावा म्हणून खडसे यांनी रात्रभर जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण म्हणू तेच खरे असे सांगतात. ते पोलिसांवर दबाव आणून नौटंकी करतात. तसेच दूध संघात खूप भ्रष्टाचाराची प्रकरणे असून या प्रकरणी आपण दुसरी फिर्याद दाखल करणार असल्याची माहिती देखील आ. चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर खडसे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला होता.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज काही मोजक्या पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. थोड्यावेळा पूर्वी खडसे यांनी पत्रकारांसोबत बोलतांना सांगितले की, मला पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेतून एका कर्मचारीच्या माध्यमातून तुमच्याविरुद्ध मोठं षड्यंत्र रचले जात असून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाणार आहे. तसेच हा कर्मचारी जामनेरचा असल्याचाही उल्लेखही खडसे यांनी केला. गुन्हा कोणत्या स्वरूपाचा, विषय नेमका विषय कोणता?, हे मात्र खडसे यांनी स्पष्ट केले नाहीय. एवढेच नव्हे तर, या षड्यंत्राबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असून काही अधिकाऱ्यांचे थेट बोलणे झाले असल्याचेही खडसे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पोलीस दलातून कानोसा घेतला असता, असा कुठलाही प्रकार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
















