धुळे (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे नेते देशात टिंगल टवाळी व चेष्टेचा विषय झाले आहेत. गेल्या ७०-७२ वर्षाच्या भारतीय राजकारणात ऐवढे विदुषकी चाळे अन्य कुणी केले नाहीत. राजकारण हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. विनोदाचा आणि लबाडीचा नाही. हे राज नारायण, लालू प्रसादांना कळाले. असे खणखणीत पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, स्वतःला संस्कारक्षम जिवनाचे मुल्य जपणारे, मुल्याधारित राजकारणाची पार्श्वभुमी सांगणारे देशातल्या १२५ कोटी जनतेला एकाचवेळी मुर्ख बनविण्याची जबरदस्त कला असणारी दुक्कल दुर्देवाने राज्यकर्ते म्हणून भोळ्या भाबड्या जनतेला वेठीस धरुन बसली आहे. खोटे बोलण्यात मोदी शहांच्या जोडगोळीने सर्व मर्यादा उल्लंघुन टाकल्या आहेत. तरीही स्वतःला ‘मर्यादापुरुषोत्तम’ प्रभु रामचंद्रांचे भक्त म्हणवतात. प्रभु रामचंद्रांची ऐवढी क्रूर चेष्ठा खुद्द रावणानेसुध्दा केल्याचे कुठेही वाचनात आले नाही. संघपरीवाराशी माझा गेल्या पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ संबंध राहिला आहे. संघ, जनसंघाच्या संघटनात्मक यंत्रणेला अत्युच्च पदावरील अत्यंत निस्वार्थी, त्यागमुर्ती व चारित्र्यसंपन्न नेत्यांचा सहवास मिळण्याचे सद्भाग्यही मला प्राप्त झाले. समोर मांडी घालून चार वाक्य ऐकावे असे नेतृत्वच आढळून येत नाही. माननीय नितीन गडकरी यांच्या व्यतीरिक्त अन्य असा एकही नेता नाही. की, ज्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवावा. दिलेल्या शब्दांचे तंतोतंत पालन करतील याची शाश्वती देता येईल. एखादे काम जर जमत नसेल तर, कुणाच्याही राग लोभाची भीड भाड न ठेवता तोंडावर स्पष्ट शब्दात सुनावून मोकळे होतील. उद्या या पुढच्या आठवड्यात भेटा! असे शब्द नितीनजींच्या गेल्या २५-३० वर्षाच्या सहवासात कधी मला ऐकण्यास मिळाले नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांना विळखा घालून बसलेल्या चपडपटूंना माझे जाहीर आवाहन आहे की, नितीनजी शिवाय अन्य एखाद्या दुसऱ्या नेत्याचे नाव सांगा ? की ते खरे बोलतात दिलेल्या शब्दाचे पालन करतात ! भाजपामधील अंतर्गत राजकारणाशी मला काडीइतकी देणेघेणे नाही. १०५ आमदार निवडून येवूनही बाहेरच्या ३९ आमदारांची सहानुभूती मिळवून सरकार स्थापन करण्याच्या बाहेरच्या रिगंणापर्यंतसुध्दा पोहचता येवू नये. राज्य भाजपा नेतृत्वाची राजकीय दिवाळखोरीच आहे ! देवेंद्र फडणवीसांचे आत्मकेंद्रीत मी मी पणाचे राजकारण कारणीभूत आहे. केवळ मोदी आणि शहांच्या दहशतीमुळे ५ वर्ष मुख्यमंत्रीपद उप भोगता आले. समोरच्या व्यक्तीला कस्पटासमान लेखण्याचा उच्चवर्णीय अहंकार, तसेच चुकूनसुध्दा कोणाशीही खरे न बोलण्याची घेतलेली शपथ ! दिवसेंदिवस ढासळत चालणारी विश्वासार्हता आपल्याच सहकान्यांशी केलेला विश्वासघात अशा कारणांचे पक्ष जोपर्यंत निराकरण करीत नाही. तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पाय रोवणे अशक्य कोटीतील बाब आहे. कै. प्रमोद महाजन, कै. वसंतराव भागवत, रामभाऊ गोडबोले, नानासाहेब उत्तमराव पाटील अशा नेत्यांनी आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचवले. अशा निस्वार्थी त्यागमूर्तीबद्दल आदर तर सोडाच पण आपल्या वर्तवणूकीतून क्षणेक्षणी व्यक्त केलेली कृतघ्नतेचे समूळ उच्चाटन होत नाही. तोपर्यंत सत्तेच्या शितल चांदण्याची अपेक्षाही करु नये, विरोधाच्या तळपत्या सूर्याच्या उष्ण लाटांमध्येच राहावे लागेल !
देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान पदावरील व्यक्ती आजपर्यंत कधी खोट बोलल्याचे एकीवात नाही. पण नरेंद्र मोदी हे नेमके खरे केव्हा बोलले ? हेच आठवावे लागेल. वडनगर स्टेशन अस्तित्वात आले नसतांनाही बेधडकपणे स्टेशनवर चहा विकत होतो, असे असंख्य मुलाखतीमध्ये सांगितले. त्याचवेळेला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी मोदींना ‘फेकू’ अशी पदवी बहाल केली. प्रारंभीच्या काळात दिग्वीजय सिंगाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. परदेशी बँकांतील काळा पैसा परत आणीन, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील अशी स्वप्ने दाखविली. सत्ता ग्रहण करताच भाजपाचे नंबर दोनचे नेते व तत्कालीन अध्यक्ष म्हणतात की, ‘अरे भाई यह चूनावी जुमला था शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे तोंड फाटेस्तोर मोदी-शहांनी सांगितले. उद्योगपतींचे ५ लाख ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. एका पत्रकाराने अमित शहांना प्रश्न विचारला किसानोंका कर्जा माफ करने का क्या हुआ शहांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितले ‘ऐ चुनावी बाते हैं. ऐसा कर्जा माफ नहीं हो सकता. भुल जाए किसान शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव आणि ५० % फायदा असे गॉडस स्वप्न दाखवून जनतेची मते लुंगावली. प्रत्येक गोष्टीचे मार्केटींग हा तर, त्यांचा आवडता छंदच आहे. जगाच्या पाठीवर अन्य कुणीही व्यक्ती नसेल की, स्वतःच्या आईला ओट्यावर आणून मातृभक्तीचेही बाजारीकरण केले असेल. नोटबंदीनंतर स्वतःच्या आईला बँकेच्या रांगेत उभे करुन आपल्या गलीच्छ राजकारणाच्या बाजारीकरणाच्या वृत्तीचे अंतीम टोक गाठले. स्वतःच्या कुटूंबापासून दूर राहून मी देशाचा संसार करीत आहे. असे दाखविण्याची तर, जबरदस्त खाज आहे. पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर ‘अच्छे दिनांचा बोर्ड कुठे काढून फेकून दिला कुणालाच माहीती नाही. आजच्या परिस्थितीत तर, आम्ही जिवंत आहोत हेच अच्छेदिन समजावे. इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. खोटे, खोटे आणि खोटेच बोलणे याला मर्यादाच नाही ‘Sky is limit’ असेच म्हणावे लागेल.
पाकीस्तानी सैनिकांनी एक भारतीय सैनिकाचे मुंडक कापून नेले त्याच्या बदल्यात दोन मुंडके आणू असे म्हणून मोदी मोदी नावाच्या गगण भेदी घोषणांनी मोदींना आत्मसंतुष्ट केले. पण कारगील युध्दातील शहिदांच्या संख्येपेक्षा जास्त संख्येने भारतीय सैनीकांना हौतात्म्य पत्करावे लागले. आभाळात ढग आले आहेत. शत्रु राष्ट्र पाकीस्तानच्या सैनिकांना आपली विमानं दिसणार नाहीत. किती हास्यास्पद आहे ? ‘मी रस्त्याने जात असतांना गटारीच्या घाणीवर तयार होणाऱ्या गॅसवर चहा करतो. असे तर, ठार वेडासुध्दा म्हणणार नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लोकसेभेच्या पटलावर सांगतात की आपला हजारो चौरस मैलाचा परिसर चिनच्या ताब्यात आहे. पण पंतप्रधान कबूलसुध्दा करीत नाही. २० भारतीय निशस्त्र जवानांचे चिनी सैनीकांनी हत्याकांड घडवले. राहूल गांधी ओरडून ओरडून सांगत आहेत. की, भारताच्या हद्दीत शेकडो मैल आत चिनी सैन्य घुसले आहे. भाजपवाल्यांनी आपल्या ‘फेकू’ साठी राहूल गांधींना ‘पप्पू’ बनवले. बांगलादेशाच्या लगत असलेल्या सिमे भागात बांगलादेशात गेल्या बरोबर बांगला विरुध्दात निर्गल आरोप करायचे. एवढेच नव्हे तर, बांगलादेशाच्या स्वातंत्र लढ्यात ‘मी तुरुंगात होतो’ असे बिनदिक्कत पणे ठोकून देणे. एखादी उच्चपदस्थ व्यक्ती एवढे खोटे बोलूच कसे शकते ? १२ फेब्रुवारी २०२० ला राहूल गांधींनी भविष्यात कोरोनाचा किती गंभीर धोका निर्माण होणार आहे. हे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले कुछ लोग देश की जनता को डरा रहे हैं असले उथळ वक्तव्य मोदींनी केले. देशातील जनतेने एकाच वेळा मुर्खपणा करुन मला दुसऱ्यांदा पंतप्रधान केले. आपल्या वर्तवणूकीतून मोदींनी जगापूढे सिध्द करुन दिले. शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करुन सत्ता स्थापन केली. भाजपाच्या नेत्यांचा ऐवढा जळफळाट ! आदळआपट सेनेने हिंदूत्व सोडून दिले, सेना निधर्मी झाली, जितके काही टोकाच वाईट बोलता येईल तेवढी बोंबाबोंब केली. मेहबुबा मुफ्तीला पाकिस्तान धार्जिणे असे म्हणून देशद्रोही ठरवीले. त्याच देशद्रोही मेहबुबा मुफ्तींना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे पातक अन्य कोणी केले नाही. तर हिंदू राष्ट्राचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या संघनिष्ठ भाजपानेच केले. ‘तुम्ही ते स्वत: प्याले तर ड्रींक आणि दुसरा प्याला तर दारुड्या’.
देशात आलेली कारोनाची महामारी हे भाजपाचे पातक आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या स्वागतासाठी १२० कोटी रुपये खर्च केले. लक्षावधी लोक रस्त्यावर आले. सोशल डिस्टसींगचा फज्जा उडविला. देशाला महामारीच्या संकटात लोटले. कोरोना भारतात मूळ धरत असतांना उपाययोजना तर नाहीच नाही. पण मध्यप्रदेशात सत्ता बदलाचे नाटक घडवीले. नंतरच्या २४ तासांत मोदींना साक्षात्कार झाला. ‘करोना महामारी आहे लगेच रेल्वे बंद, कारखाने बंद, मंत्रालय सचिवालय बंद सुरु फक्त मोदींच्या थापा आणि लबाड्या, फेकू गिरी ! कोरोना हारेगा, देश जितेगा ना करोना हारला ना देश.
निवडणूका सुरु असलेल्या पाचही राज्यांमध्ये दिवसभर लाखा-लाखाच्या सभा करायच्या सभेमध्ये लोकांनी एकमेकांना चिटकून बसायच! मास्क लावयचाच नाही ! प्रचार ओटोपून मोदी दिल्लीत गेले की. साळसूद चेहरा करुन वर म्हणायचे ‘दो गज की दूरी, मास्क है जरुरी देशाचा पंतप्रधान एवढा ढोंगी म्हटल्यानंतर आपल्या देशाचे काय होणार ? कितीही निरागस चेहरा करुन, दाढी वाढवून, खरे बोलायचेच नाही. तुमच्या लांड्या लबाड्यांवर विश्वास ठेवायचा यालाच ‘विकास’ म्हणायचे का?
महाराष्ट्रात तर, भाजपाने हीन दर्जाच्या राजकारणाचा कळस गठला आहे. पालघर जिल्ह्यात साधू हत्याकांडामध्ये अन्य धर्मीयांचा काडीइतका संबंध नव्हता. भाजपाचे सगळे ‘पोपट’ एकदम जोरात सुटले. पालघर जिल्ह्यातील मिशनरींना टार्गेट करण्यात आले. अखेरीस चौकशीत निष्पन्न झाले की, त्या गावात गेल्या २० वर्षापासून भाजपाचीच सत्ता आहे. मग सुशांतसिंग रजपूत प्रकरण ! या महान क्रांतीकारी, देशभक्त, चारित्र्यवान, निर्व्यसनी अभिनेत्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात भाजपचे ‘हाकारी सुसाट सुटले. आत्महत्या नाही हत्याच आहे. हीच हाकाटी मातोश्रीपर्यंत धागेदोरे ? आदल्या रात्री काय घडले ? वगैरे संशयी वातावरण निर्मिती काही झाली नाही. भाजपामधील काही कर्तृत्वशून्य नेत्यांच्या राजकारणाची सुरवात ‘मातोश्री’तूनच झाली. त्यांच्या मर्यादासुध्दा मातोश्रीपर्यतच आहेत. ‘मौला की दौड मस्जीद तक सुशांतसिंग प्रकरण सी.बी.आय. कडे द्या. म्हणजे आम्हाला आमचे राजकीय हिशोब चुकते करता येतील. परंतू अनिल देशमुखांनी कडाडून विरोध केला. राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या वैद्यकीय अहवालात सुशांतसिंग रजपूताची हत्या नसून आत्महत्या आहे. असा निष्कर्ष काढण्यात आला. मग आले अर्णव गोस्वामी प्रकरण, अर्णव गोस्वामी म्हणजे जणुकाही लोकमान्य टिळकच, अन्वय नाईक खुन झाला भाजपावाल्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला. प्रकरणाचा पर्दाफाश अर्णव गोस्वामीचा टी. आर. पी. घोटाळा बाहेर येताच भाजपाचे नेते पुन्हा चिडीचूप ! आता कुणाची दाढ उठत नाही. सदर प्रकरणाचे झाले काय हे सांगण्यासाठी ? आता निर्माण केले मुकेश अंबानीच्या घरासमोर ठेवलेली कथित ‘स्फोटके’. ज्या २० जिलेटीनच्या कांड्या आढळल्या म्हणजे जणू काही अणूबॉम्बच ठेवला ऐवढा आरडा ओरडा ! दिल्ली पासून गल्ली पर्यंत सर्व एका सुरात कोकाटले. जिलेटीनचा उपयोग ग्रामीण भागात विहीर फोडण्यासाठी होतो. विहीर खोदण्याकरीता किंवा दगड फोडण्याकरीता जिलेटीन वापरले जाते. पण जिलेटीनचा वापर एवढा सहज आणि कोणालाही करता येईल इतका सोपा नाही. जिलेटीन चार्ज करण्याकरीता आणि त्याचा स्फोट घडवून आणण्याकरीता ‘डीटोनेटर्स लागतात. सदर डिटोनेटर्स जिलेटीनमध्ये घातल्यानंतर त्याला इलेक्ट्रीकल चार्ज करावे लागते. पूर्ण चार्ज झाल्यानंतर बटन दाबल्यानंतर मगच स्फोट होवू शकतो. अन्यथा जिलेटीन स्फोटकांचा काही उपयोग नाही. ते आर. डी.एक्स. नव्हे ! मुंबई बॉम्ब ब्लास्ट सारखे ताबडतोब फुटतील. होत्याच नव्हत करुन टाकतील. जगातली कुठली शक्ती काट्याचा नायटा’ करण्यात भाजपाचा हात धरू शकत नाही. आमच्या लहानपणी गावाच्या बाहेर गावाठाणांमध्ये धान्य काढण्यासाठी खेळी केलेली असत. भुरट्या चोरांपासून आपल्या मालाचा बचाव करण्याकरीता खळ्यामध्ये एखादं कुत्र पाळण्याची पध्दत होती. प्रत्येक शेतकरी काही आपली स्वतंत्र कुत्री पाळत नसे. एक कूत्रे सगळ्या खळ्याच्या रक्षणासाठी पुरेसे होत असे. कारण परक्या माणसाची चाहूल लागली एक कुत्र भुंकल की आख्या गावातली कुत्री भुंकत असत. काही केल्या शांत होत नसत. टी. व्ही. लावल्यानंतर मला उगाचच ते लहानपणचे दिवस आठवतात. एकाच आवाजात एकाच सुरात भुंकतात. मनापासून तोवर लागले गाव जागायला. हसू येत अरे चोर आलाच नाही अजून! पाहील की, नुसती हालचाल झाली. कुठल्याही घटनेचे राजकीय भांडवल करायचे घसा कोरडा होईस्तोवर सर्वांनी एका आवाजात केकाटायचे हा प्रघातच पडला आहे.
कोरोनाच्या संकटावर नेमकी मात कशी करायची ? याबद्दल अवाक्षर काढायचे नाही; सरकाविरुध्द येथेच्छ बोंबाबोंब करायची! करोनाचे संकट राज्यातल्या १३ कोटी जनतेवर आले आहे. आपणा सर्वांना यातून मार्ग काढावा लागेल. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चपडपटूंनी समजूतदारपणाची तर केव्हाच ऐशीतैशी करुन टाकली. देवेंद्र फडणवीस ६७ महिन्यापुर्वी म्हणत होते सरकार मृतांचे आकडे लपवत आहे. सरकार कोरोनाकडे गांभीर्याने बघत नाही. जे मनाला येईल तसे बोलून भाजपाने नेमके साधले काय ? केंद्राकडे जाऊन आपण आपला हक्काचा निधी आणू! लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रेमडिसीवीर इंजेक्शन, प्राणवायूचे बाटले, व्हॅटीलेटर जास्तीत जास्त मिळवून महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवू! असे तर, चुकूनसुध्दा कोणी बोलला नाही. तीनही गोष्टींच्या आभावी रोज शेकड्यांनी माणसं मरता आहेत. स्मशान भूमीत जागा नसल्याने रस्त्या लगत प्रेते जाळावी लागत आहेत. गुजराथची अवस्था तर, अत्यंत भयावह आहे. अहमदाबाद मधील सर्व स्मशान भूमीच्या बाहेर तीस-तीस चाळीस चाळीस अॅम्बुलन्स प्रेत जाळण्याकरीता टोकन घेऊन उभ्या आहेत. आंबेजोगाईला एकाच ओट्यावर आठ प्रेते जाळावी लागली. कोण कोणाची राख गोहा करणार ? अंतीम संस्कार करणार कसे ? इतक्या विदारक परिस्थितीत भाजपाला राजकारण सुचते. काळजी करु नका! ‘वो दिन याद करो’ ! असेच म्हणावे लागेल. एखाद्या गणपती मंडळाच्या अध्यक्षाप्रमाणे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनवर काय जातात. तमाशे करतात. आपल्या गुजराथ मधील मालकांची मर्जी साभांळण्यासाठी महाराष्ट्राच्या रक्ताची केलेली बेईमानी जनता विसरणार नाही. काही तडफडून मरता आहेत. पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, १८ महिन्यापूर्वी सत्ता भोगण्याच्या पक्षाला या जनतेशी काही देणेघेणे नाही. प्रेताच्या जळत्या चितेवर तुम्ही किती काळ भाकऱ्या भाजणार आहात ? नरेंद्र मोदी असो, अमीत शहा असो, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील देशातील सर्वोच्च व राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप आणि त्यांचे नेते हा टिंगल टवाळी आणि विनोदाचा विषय व्हावा याचे खरोखरच मनापासून दुःख होते तुम्हाला कोणी गांभीर्याने घेत नाही. संकटात सापडलेल्या राजकुमाराप्रमाणे चेहरा करुन टी. व्ही. वर येणाऱ्या पंतप्रधानांना लोक हसतात टिंगल करतात. व्यंगचित्राचा विषय करतात याची ना खंत ना खेद ! याच्या इतका निर्लज्जपणा दुसरा नाही. असे खणखणीत पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अनिल अण्णा गोटे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.