मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायतींसाठी आणि २ जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. आज अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक पातळ्यांवर महा विकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याने, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्यांचा करण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे.
राज्यातील मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ (सिंधुदुर्ग), देहू (पुणे), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी (सातारा), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर वैराग, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
तसेच भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगर पंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ३९ जागासाठी पंचायत समितीच्या ७९ जागा तर नगर पंचायतिच्या ३९ जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ जागा नगर पंचायतीच्या ८९ जागा तर पंचायत समितीच्या ४५ जागासाठी हे मतदान होत आहे.