मुंबई (वृत्तसंस्था) भाजप विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकत असल्याचा, गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून, वेळ आली की ही माहिती समोर आणू, असंही ते म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकार सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, पण बिघाडी आघाडीत नाही तर भाजपमध्ये दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत परंतु आकड्यांचे गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी १२ मतांची आवश्यकता आहे तर भाजपला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवश्यावर भाजप विजयाचा दावा करत आहे. तो यावेळी चालणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असून, आवश्यक असलेले संख्याबळ मविआकडे असल्याने मविआचे सहाही उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.