जळगाव (प्रतिनिधी) पोलीस असल्याची बतावणी करीत रस्त्याने पायी जाणाऱ्या चुन्नीलाल दौलत पाटील (वय ६८, रा. त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटी) यांना दुचाकीस्वार तरुणांनी थांबवले. त्यांच्या तोंडाजवळ रुमाल झटकून त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या रुमालात ठेवून हातचालाखी करीत त्या लांबवून नेल्या. ही घटना दि. १५ रोजी सायंकाळच्या सुमारास पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील त्रिमुर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये चुन्नीलाल पाटील हे सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते भवानी माता मंदिराजवळून पायी फिरत होते. यावेळी त्यांच्या समोरुन दोन दुचाकीस्वार तरुण तोंडाला रुमाल बांधून त्यांच्याजवळ आले. त्यांनी वृद्ध पाटील यांना तुम्ही या रोडवर एकटे फिरत का आहेत, याठिकाणी काल एका जणाचे अपहरण करुन त्याच्याजवळील तीन लाख रुपये घेवून घेतले आहे. आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला सावध करत आहोत, असे ते म्हणाले.
रुमाल तोंडाजवळ झटकत केली हातचालाखी
दुचाकीवरील एकाने त्याच्या रुमाल काढून वृद्ध चुन्नीलाल पाटील याच्या चेहऱ्यासमोर झटकला. यावेळी त्यांना काहीही समजून आले नाही, त्यानंतर वृद्धाला खिशातून रुमाल काढण्यास सांगून त्यामध्ये बोटातील अंगठ्या ठेवण्यास सांगितल्या. वृद्ध चुन्नीलाल पाटील यांनी देखील बोटातील ६० हजार रुपये किंमतीच्या दहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून रुमालात ठेवल्या.
अंगठ्या रुमालात ठेवताच चोरटे पसार
अंगठया रुमालात ठेवताच दुचाकीवरुन आलेले दोघे चोरटे तेथून पसार झाले. दहा मिनिटांनंतर वृद्ध चुन्नीलाल पाटील यांना बरे वाटल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर ते लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे.
















