भुसावळ (प्रतिनिधी) खोदकाम करताना जमिनीत पुरलेले जुने सोने सापडले असून त्याची कमी दरात विक्री करायची आहे, अशी बतावणी करत त्याआड बनावट सोने विकणाऱ्या राजस्थान येथील दोन ठगांना पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. दोघं ठगांकडून एक किलो बनावट सोने हस्तगत करण्यात आले आहे. लोकांनी अशा ठगांच्या भूलथापांना बळी पडू नये व या कालावधीत ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर व परिसरात चार ते पाच दिवसांपासून दोन जण काचेचे मंदिर विकत होते. मंदिर विकत असतानाच ते लोकांना आमच्याकडे खोदकाम करताना मिळालेले एक ते दीड किलो सोन्याचे दागिने असून ते पाच लाखांत विकायचे असल्याचे सांगत भुरळ घालत होते. याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त माहिती मिळाली. या आधारावर हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, यासीन पिंजारी यांच्या पथकाला त्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत सूचित केले. ते दोन दिवसांपासून पथकाला गुंगारा देत होते.
पोलिसांनी शिरपूर कन्हाळा रोडवर वर्ल्ड स्कूल जवळ सापळा रचला. डमी ग्राहक बनून त्यांच्याकडून दागिने घेत त्यांना पाचशेच्या नकली नोटांचे बंडल दिले. त्याच्यावेळी आरोपी किसनलाल दौलतराम बागरी (वय ३६ रा.बल्लूर, ता. जि. सिरोही) आणि त्याचा साथीदार बाबूलाल ओबाराम बाग (वय ४२, रा. लक्ष्मीनगर बिबल्सर, ता. जि. जालोद) या राजस्थान येथील ठगांना ताब्यात घेतले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज पाटील, रमण सुरळकर, गणेश राठोड, यासीन पिंजारी हे करीत आहेत.