पुणे (वृत्तसंस्था) देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (28 नोव्हेंबर 2020) देशातील तीन शहरांचा दौरा केला. या तिन्ही ठिकाणी कोरोना लसीच्या निर्मिती केली जात आहे. त्यानुसार मोदींनी कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधान कॉन्फरन्स रूममध्ये जातील. तिथे सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार केल्या जात असलेल्या लस निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली आहे, याबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ठिकाणी लस बनवली जाते आहे त्या प्लांटला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा सीरम इन्स्टिट्यूट भेटीचा कार्यक्रम एक तासाचा असणाार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले तेव्हा मोजक्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले.जनरल सी.पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.