नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस घेतली आहे. आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली. मोदींनी स्वतः याची माहिती देत सांगितले की, ‘कोरोनाविरुद्ध या वैश्विक लढाईत आपल्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी सर्वोत्तम काम केले आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला कोरोनामुक्त करूयात’. पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची कॅव्हॅक्सिन लस घेतली आहे. पद्दुचेरीची नर्स पी निवेदा यांनी मोदींना लस दिली.
मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला कोरोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा
कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आज १ मार्चपासून सुरू होत असून ६० वर्षे पूर्ण केलेले तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना या टप्प्यात प्राधान्यक्रमाने लस दिली जाईल. याशिवाय, सर्वसामान्यांसाठीही लसीकरण सुरू होत असून को-विन 2.0 (Co-WIN2.0) ॲप/ पोर्टलवर सकाळी ९ वाजता नोंदणी सुरू होईल. तसेच लसीकरण केंद्रांवरही नोंदणी करता येईल. या टप्प्यात १० हजार सरकारी व २० हजार खासगी रुग्णालयांत लसीकरणाची केंद्राची योजना आहे. राज्यात हा टप्पा पालिकांच्या तसेच शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतूनही राबवला जाईल.