नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगातील महासत्ता राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतत बाजी मारलेल्या जो बायडेन यांच्याशी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये दूरध्वनीवरुन झालेल्या संवादात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली, यावरुन त्यांनी पडदा उचलला.
अमेरिकेच्या विद्यमान अध्यक्षपदी नाव घोषित झाल्यानंतर या दोन्ही मोठ्या नेत्यांमधील हा पहिलाच दूरध्वनी संपर्क ठरला. पंतप्रधान मोदी यांनी बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन करत भारत- अमेरिका या दोन्ही देशातील नातं आणि इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. संवाद साधतेवेळी बायडन यांच्याशी यापूर्वी झालेल्या चर्चेतील आठवणींनाही पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला. २०१४ आणि २०१६ मध्ये मोदींच्या अमेरिका भेटीदरम्यान हा संवाद झाला होता. मुख्य म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असणारं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं सर्वज्ञात आहे. तेव्हा आता जो बायडेन या नव्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांशी असणाऱ्या मोदींच्या मैत्रीपूर्ण नात्याचा देशाच्या दृष्टीनं नेमका काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अमेरिकेत असणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाच्या दृष्टीनं कमला हॅरिस यांच्या वाट्याला आलेलं यश हे अतीव महत्त्वाचं असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांमध्ये यावेळी दूरध्वनीवरुन कोविड १९ बाबतची परिस्थिती, वातावरणातील बदल या मुद्द्यांवरही चर्चा झाली.